शेरशाह: आजही कॅप्टन विक्रम बत्रांच्या आठवणीत रमल्यात डिंपल चीमा; सध्या जगतात असं आयुष्य

विक्रम बत्रा यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे; पण डिंपल चीमा यांच्याविषयी फार कोणाला माहिती नव्हती. या चित्रपटानं चीमा…
विक्रम बत्रा यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे; पण डिंपल चीमा यांच्याविषयी फार कोणाला माहिती नव्हती. या चित्रपटानं चीमा यांच्या त्यागाची, अनोख्या प्रेमाची माहिती जगासमोर आणली आहे.
भारतीय सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणाऱ्या कारगिल युद्धाला (Kargill War) 22 वर्षं पूर्ण झाली तरी आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात या युद्धाच्या आठवणी ताज्या आहेत. या युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्यांच्यासारख्या अनेक वीर जवानांच्या बलिदानानं आजही भारतीयांच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्यांच्या पराक्रमानं, त्यागानं ऊर भरून येतो.
या कारगिल युद्धात आपल्या भीम पराक्रमानं शत्रूलादेखील स्तिमित करणारे कॅप्टन विक्रम बत्रा (Captain Vikram Batra) यांच्या जीवनावर आणि शौर्यावर आधारित ‘शेरशाह’ (Shershah) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला असून, या चित्रपटातील सर्वांत मोठं आकर्षण ठरलं आहे ती म्हणजे विक्रम बत्रा आणि डिंपल चीमा (Dimple Cheema) यांची प्रेमकथा.
एक शूरवीर योद्धा आणि त्याच्या आठवणीत आपलं उभं आयुष्य काढणारी त्याची प्रेयसी यांची ही खरीखुरी कहाणी प्रेक्षकांना भावूक करत आहे. शेरशाह या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Siddharth Malhotra) परमवीर चक्र पुरस्कार विजेता शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची तर कियारा अडवाणी (Kiara Advani) हिनं त्यांची प्रेयसी डिंपल चीमा यांची भूमिका साकारली आहे. रिपब्लिक वर्ल्ड डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
विक्रम बत्रा यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे; पण डिंपल चीमा यांच्याविषयी फार कोणाला माहिती नव्हती. या चित्रपटानं चीमा यांच्या त्यागाची, अनोख्या प्रेमाची माहिती जगासमोर आणली आहे. त्यामुळं आता डिंपल चीमा यांच्याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिंपल चीमा यांची प्रेमकहाणी एखाद्या रोमँटिक चित्रपटासारखी आहे. शेरशाह चित्रपटात ‘रांझा’ या गाण्यात त्यांच्या नात्याचे अतिशय सुंदर चित्रण करण्यात आलं आहे.
विक्रम आणि डिंपल यांची पहिली भेट 1995 मध्ये पंजाब युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये झाली होती. दोघांनीही इंग्रजी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता; पण सैन्यात भरती होणं हेच विक्रम यांचे स्वप्न होते. त्यामुळे इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली सीडीएसची (CDS) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी विद्यापीठ सोडले.
डिंपलनंही तिचा पदव्युत्तर कोर्स पूर्ण केला नाही. विक्रम बत्रा प्रशिक्षणासाठी डेहराडूनला गेल्यानंतर बराच काळ डिंपल चीमा आणि त्यांची भेट होणं शक्य झालं नाही, मात्र सुट्टीत ते घरी परत आल्यानंतर त्यांचं प्रेम पुन्हा फुललं. त्यांच्या गाठीभेटी होऊ लागल्या. त्यावेळी डिंपलनं त्यांना लग्नाविषयी विचारताच विक्रम यांनी पाकिटातून ब्लेड काढून आपला अंगठा कापला आणि डिंपल यांच्या भांगात आपलं रक्त भरलं. हा क्षण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता, असं डिंपल सांगतात.
डिंपल यांनी सांगितलेला आणखी एक किस्साही त्यांच्या अनोख्या प्रेमकहाणीची साक्ष देतो. विक्रम आणि डिंपल नेहमी मनसा देवीच्या मंदिरात जात असत. एकदा विक्रम आणि डिंपल मनसा देवीच्या मंदिरात एकत्र होते. प्रदक्षिणा घालत असताना विक्रम डिंपल यांच्या मागून चालत होते. प्रदक्षिणा घालून संपल्यावर विक्रम डिंपल यांना म्हणाला, ‘अभिनंदन! मिसेस बत्रा.’ हे ऐकून डिंपल त्यांच्याकडे बघतच राहिल्या. तेव्हा विक्रम हसून म्हणाले की, तुमच्या लक्षात आलं नाही का, आपण चार वेळा एकत्र प्रदक्षिणा घातली आहे.
यानंतर विक्रम बत्रा यांचं कारगिलला पोस्टिंग झालं आणि ते कारगिलला गेले. तिथून परत आल्यानंतर त्यांनी आणि डिंपल यांनी लग्न करण्याचं ठरवलं होतं;पण नियतीला ते मंजूर नव्हतं. कारगिल युद्धात लढताना कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आलं. ते परत आलेच नाहीत. मात्र डिंपल यांनी त्यांची विधवा म्हणून जगण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या चंदीगडमध्ये राहतात. इथेच त्यांनी विक्रम बत्रा यांच्यासोबत प्रेमाचे असंख्य सुंदर क्षण घालवले. त्या आठवणीत डिंपल आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत.
शेरशहा चित्रपटातील डिंपल यांच्या भूमिकेच्या तयारीसाठी कियारा अडवाणी हिनं डिंपल यांची भेट घेतली होती. त्यांची कहाणी ऐकून तीदेखील भारावून गेली होती. ‘डिंपल या एक अनसंग हिरो (Unsung Hero) आहेत. ज्यांनी आपल्या प्रेमासाठी आपल्या आयुष्य अर्पण केलं. प्रत्येक आव्हानाचा सामना केला. डिंपल या आजच्या भारतीय महिला आहेत, ज्या स्वतःचा निर्णय स्वतः घेतात आणि त्याचा अभिमान बाळगतात. प्रत्यक्षात चार चौघांच्या साक्षीनं लग्न झालेलं नसताना देखील आपल्या शहीद प्रियकराच्या आठवणीत कायम अविवाहित राहण्याचा त्यांचा निर्णय आणि तिचा प्रेमावरील विश्वास मला नेहमीच प्रेरणा देईल,’ अशी भावना तिनं व्यक्त केली आहे.