‘रानबाजार’साठी गुटखा खाण्याचा असा केला सराव, प्राजक्ता माळीचा व्हॅनिटीमधील VIDEO व्हायरल

‘रानबाजार’ या वेब सीरिजमध्ये दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहायला मिळतो आहे. या साऱ्यांमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव विशेष चर्चेत आहे. तिने साकारलेली बोल्ड भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
मराठी वेब सीरिज ‘रानबाजार’ सध्या (Raanbaazaar) ऑनलाइन जगतात चर्चेचा विषय बनली आहे. ही सीरिज म्हटलं की डोळ्यासमोर नाव येतं ते अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ (Prajakta Mali in Raanbaazaar) हिचं. या सीरिजमधील जबरदस्त अभिनयानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कमालीचा प्रेक्षकवर्ग कमावला आहे. अभिनेत्री या सीरिजमधील तिच्या ‘रत्ना’ या भूमिकेविषयीही भरभरुन लिहिताना दिसते आहे. तिने सोशल मीडियावर केलेली प्रत्येक पोस्ट व्हायरल होत आहे. आता देखील प्राजक्ताने तिने व्हॅनिटी व्हॅनमध्ये एका खास गोष्टीचा सराव कसा केला होता, याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
प्राजक्ता माळी हिने व्हॅनिटीमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती काहीतरी चघळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘रानबाजार’मधील रत्नाच्या गेटअपमध्ये दिसते आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, ‘Vanity मध्ये बसून बडीशेप खात मसाला गुटखा वगैरे खातेय असं भासवण्याची practic. ह्या दिवशी पहिल्यांदा make up केला होता… सुंदर दिसण्यासाठी नाहीत अर्थात.’ प्राजक्ताने एक फोटो देखील या पोस्टसह शेअर केला आहे. रत्नाच्या जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये प्राजक्ताचा हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.
प्राजक्ता माळी हिने याआधी देखील ‘रत्ना’चा व्हिडिओ पोस्ट केला होता. या सीरिजचे फिनाले एपिसोड प्रदर्शित होण्याआधी अभिनेत्रीने तिचा ‘रानबाजार’मधील प्रवास मांडणारा हा व्हिडिओ शेअर केला होता.
अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ची (Ranbazar) घोषणा झाल्यापासूनच मोठी चर्चा झाली. तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांचा लूक समोर आल्यानंतर ही चर्चा अधिक वाढी. पॉलिटिकल थ्रिलर असणाऱ्या या भव्य वेब सीरिजची ‘असंच काहीसं घडलं होतं… कदाचित ?!’ ही टॅगलाइनच बरेच काही सांगून जाणारी आहे.
या सीरिजचे शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग १० जून रोजी प्रदर्शित झाले. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सीरिजला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या सीरिजमध्ये प्राजक्ता-तेजस्विनी यांच्यासह मोहन आगाशे, मोहन जोशी, अभिजीत पानसे, मकरंद अनासपुरे, उर्मिला कोठारे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अनंत जोग, माधुरी पवार, सुरेखा कुडची आणि वनीता खरात यांच्या मुख्य भूमिका आहेत.