रक्षाबंधनासंबंधी अनेक मान्यता, जाणून घ्या या कथा आणि खास महत्व

रक्षाबंधनासंबंधी अनेक मान्यता, जाणून घ्या या कथा आणि खास महत्व

भाऊ बहिणीचे नाते विणणारी दोर म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाला पुराणकाळात नेमके काय म्हटले जायचे? रक्षाबंधनाची सुरुवात साधारण कधीपासून झाली? पुराणात या संदर्भात कोणकोणत्या कथा आढळतात? जाणून घेऊया…

भाऊ बहिणीचे नाते विणणारी दोर म्हणजे रक्षाबंधन. या वर्षी रक्षाबंधन रविवार २२ ऑगस्ट २०२१ रोजी असून, श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. रक्षाबंधनासंदर्भात आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळून येतो. रक्षाबंधनाची सुरुवात सतयुगापासून झाली, असा दावा केला जातो. रक्षाबंधनाला पुराणकाळात नेमके काय म्हटले जायचे? रक्षाबंधनाची सुरुवात साधारण कधीपासून झाली? पुराणात या संदर्भात कोणकोणत्या कथा आढळतात? जाणून घेऊया…

यांना सर्वप्रथम राखी अर्पण करावी- श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनासंदर्भात अनेक मान्यता आहेत. देशाच्या काही भागात याला गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते. राजा दशरथ आणि श्रावण बाळ भेट प्रसंगाशीही रक्षाबंधनाचा संबंध जोडला जातो. प्रथमेश असलेल्या गणपतीला सर्वप्रथम राखी अर्पण करावी, असे मानले जाते. यानंतर श्रावण बाळाच्या नावाने एक राखी काढून ठेवावी आणि त्याला ती समर्पित करावी. याशिवाय प्राणवायू देणाऱ्या वृक्षांनाही आपण एक राखी बांधू शकतो, असे सांगितले जाते.

शचीदेवीचे रक्षाबंधन- देव आणि दानवांमध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले आणि दानव देवांवर आधिपत्य गाजवू लागले, तेव्हा देवतांचा पराभव होत असल्याचे पाहून देवराज इंद्र ऋषी बृहस्पतींकडे गेले. तेव्हा बृहस्पतींच्या सांगण्यावरून इंद्राची पत्नी इंद्राणी म्हणजेच शचीने एक रेशीम धागा बांधला. परिणामी इंद्र विजयी झाले. योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेव्हापासूनच युद्धात विजयी होण्यासाठी आपल्या पतीला रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते.

कृष्ण आणि दौपदी- रक्षाबंधनाशी संबंधित एक महाभारतकालीन गोष्ट सांगितली जाते. एकदा भगवान श्रीकृष्णाचा हाताला दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. द्रौपदीने लगेच आपल्या साडीच्या पदराचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. यामुळे रक्तस्राव थांबला. कालांतराने जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णानेच वस्त्र वाढवून या बंधनाचे ऋण फेडले, असे सांगितले जाते. याशिवाय पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला रक्षाबंधन साजरे करावे, असे सल्ला दिला होता, अशी मान्यता आहे.

लक्ष्मीदेवी आणि बली- स्कंदपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद्भागवतानुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बलिकडे तीन पाऊले जमीन मागितली. त्यांना पातालाचा राजा बनविले. त्यावेळी राजा बलीनेही भगवंतांकडून दिवस-रात्र आपल्यासमोर राहण्याचे वचन घेतले. वामनावतारानंतर श्रीविष्णूंना पुन्हा लक्ष्मी देवीकडे जायचे होते. पण श्रीविष्णू वचनात बांधले गेल्यामुळे पातालात राहून बलीच्या सेवेत राहू लागले. अनेक दिवस झाले, तरी श्रीविष्णू परतले नाही म्हटल्यावर लक्ष्मी देवी काळजीत पडल्या.

नारदाने लक्ष्मी देवींना एक तोडगा सांगितला. तेव्हा लक्ष्मी देवीने राजा बलीला राखी बांधून आपले भाऊ बनविले. श्रीविष्णूंना आपल्यासोबत नेण्याचे वचन बली राजाकडून मागितले. तसेच वर्षातील चार महिने श्रीविष्णू पातालात येऊन आपल्याला दिलेल्या वचनाचा मान ठेवतील, असेही लक्ष्मी देवींनी बली राजाला सांगितले. हाच कालावधी चातुर्मास म्हणून साजरा केला जातो. लक्ष्मी देवींनी राजा बलीला रक्षासूत्र बांधले, तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमा होता, अशी मान्यता आहे.

Team Beauty Of Maharashtra