पंचक लागले असताना मृत्यू होणे का मानतात अशुभ? वाचा, मान्यता..

पंचक लागले असताना मृत्यू होणे का मानतात अशुभ? वाचा, मान्यता..

भारतात वैदिक ज्योतिषाला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. सर्व प्रकारची पर्व या ज्योतिषाच्या आधारे निश्चित केले जाते. वैदिक ज्योतिषात ग्रह-नक्षत्रांचा अधिक विचार केला जातो. पंचांगाचे तिथी, वार, योग, ग्रह-नक्षत्र, मुहूर्त, करण मुख्य भाग असून, यामधील पंचक काल सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. पंचक लागण्याची वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. पंचक कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे.

पुराणातील काही उल्लेखांनुसार, रामायण काळात श्रीरामांनी रावणाचा वध केला, तेव्हा पंचक लागले होते. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ते अशुभ मानले जाते. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा शास्त्रात केल्याचे पाहायला मिळते. नोव्हेंबर महिन्यात २१ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत पंचक आहे. पंचक म्हणजे काय? पंचक किती प्रकारचे असते? जाणून घेऊया…
पंचक म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानसार, पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार, या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो. खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ३६० अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या ३०० डिग्री ते ३६० डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक मानले जाते. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते.

पंचक कालावधीत काय करू नये?- ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक कालावधीत काही कार्ये करणे निषिद्ध मानले गेले आहे. पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये. घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम करू नये. पंचक कालावधीत कुठल्याही प्रकारचा पलंग विकत घेणे किंवा बनवणे, बेड खरेदी करणे किंवा बेडचे दान करू नये. पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे. कोणात्याही प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

पंचक कालावधीत काय करावे?- पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ नसते, तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते. या कालावधीत यात्रा करणे, मुंडन कार्य, व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानले गेले आहे. तसेच साखरपुडा समारोह, विवाह आदी शुभ कार्ये पंचक कालावधीत केली जाऊ शकतात. पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्यांचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो. काहीवेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात. याशिवाय वाहन खरेदी, गृह प्रवेश, शांती पूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्ये करणे पंच कालावधीत शुभ मानली गेली आहेत.

पंचकाचे प्रकार- ज्योतिषानुसार, सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा भिन्न असतो. पंचक कोणत्या दिवशी लागते, यावर त्याचा प्रभाव कसा आणि किती असेल हे अवलंबून असल्याचे सांगितले जाते. पंचकचा प्रारंभ रविवारी होतो, तेव्हा त्याला रोग पंचक म्हणतात. पंचक सोमवारी सुरू होते, तेव्हा त्याला राज पंचक म्हणतात. मंगळवारी लागणारे पंचक अग्नी पंचक नावाने संबोधले जाते. बुधवारी आणि गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक म्हटले जाते. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकला चोर पंचक म्हटले जाते. शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटले जाते.

पंचक कालावधीतील मृत्यू– पंचक काळात मृत्यू होणे शुभ मानले जात नाही. पंचक कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या जीवितहानीची शक्यता असते. पंचक दोष लागू नये, यासाठी काही उपाय शास्त्रात सांगितले गेले आहेत. पंचक कालावधीत कोणाचा मृत्यू झाला, तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचे अंतिम संस्कार करताना दर्भाचे एक प्रतीक तयार करून त्याचा दाहसंस्कार मृतकासोबत करण्याचे विधान आहे, असे सांगितले जाते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Beauty Of Maharashtra