मे महिन्यात मंगळ बदलणार आपली रास, गोचरामुळे तीन राशींचे आर्थिक स्त्रोत होणार मोकळे

मे महिन्यात मंगळ बदलणार आपली रास, गोचरामुळे तीन राशींचे आर्थिक स्त्रोत होणार मोकळे

एप्रिल महिन्यात ग्रहांची बरीच उलथापालथ होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरु ग्रह वर्षाभरासाठी मेष राशीत गोचर करणार आहे. दुसरीकडे ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह राशी बदल करणार आहे. साहस, शौर्य, राग, शत्रू, अस्त्र-शस्त्र, दुर्घटना, आजार या घटनांचा मंगळ कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे मंगळाच्या गोचरामुळे काही राशींच्या जातकांवर परिणाम दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह 10 मे 2023 रोजी राशी बदल करणार आहे. मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

सेनापती मंगळ ग्रह 10 मे रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. दुपारी 2 वाजून 13 मिनिटांनी हा राशी बदल होईल. या राशीत मंगळ 1 जुलैपर्यंत ठाण मांडून बसणार आहे. त्यानंतर सिंह राशीत प्रवेश करेल. तत्पूर्वी 10 मे ते 1 जुलै हा कालावधी काही राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. तर काही राशींसाठी अडचणीचा ठरणार आहे.

मंगळ गोचरामुळे या राशीच्या जातकांना मिळणार लाभ
कन्या : या राशीच्या एकादश भावात मंगळ ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना मंगळाची साथ मिळेल. अडकलेली कामं मार्गी लागतील. आर्थिक स्थिती या काळात मजबूत होईल. याबरोबर उद्योग धंद्यात सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. असं असलं तरी कौटुंबिक वातावरण मात्र तणावाचं राहील. त्यामुळे जितकं शांत राहता येईल तितका प्रयत्न करा. कारण यामुळे वाद विकोपाला जाऊ शकतात.

कुंभ : मंगळ ग्रह या राशीच्या षष्टम भावात गोचर करणार आहे. त्यामुळे शत्रूपक्षावर मात मिळवणं सोपं होईल. इतकंच काय तर शत्रूपक्षाची पळता भूई थोडी होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्यामुळे पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. मात्र असं असलं तरी खर्चावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग जुळून येईल. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल.

मीन : या राशीच्या पंचम भावात मंगळ गोचर करणार आहे. यामुळे जातकाच्या आर्थिक स्थिती बदल झालेला दिसून येईल. इतकंच काय तर गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. न्यायालयीन प्रकरणातही यश मिळेल असं ग्रहमान आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. बायकोचं आणि आईचं एकत्रित नांदणं सुखावह राहील.

Team BM