Jacqueline Fernandez, Nora Fatehi नंतर आता महाढग सुकेश चंद्रशेखरशी जोडलं जातंय ‘या’ अभिनेत्रीचं नाव; २१५ कोटींच्या मनी लॉड्रिंगचं आहे प्रकरण

Jacqueline Fernandez, Nora Fatehi नंतर आता महाढग सुकेश चंद्रशेखरशी जोडलं जातंय ‘या’ अभिनेत्रीचं नाव; २१५ कोटींच्या मनी लॉड्रिंगचं आहे प्रकरण

महाढग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीची नावे सातत्याने समोर येत आहेत. ईडीने या २१५ कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे. सुकेश चंद्रशेखरने तिला सुमारे ७ कोटी रुपयांचे दागिने गिफ्ट केल्याचा आरोप जॅकलिनवर आहे. याशिवाय आणखीही अनेक किमती वस्तू तिने त्याच्याकडून घेतल्याचा आरोप आहे.

जॅकलीनसोबत बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हिलाही याच प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीत नोरा फतेहीने सांगितले की, मी सुकेशच्या पत्नीला एका नेल आर्ट फंक्शनमध्ये भेटले होते. तिथेच त्याने मला BMW कार भेट दिली. त्या दोघांचा गुन्हेगारी इतिहास आहे, याची मला कल्पना नव्हती. यासोबतच नोराने सांगितले की, माझा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्याशीही कोणताही प्रकारचा संबंध नाही.

या दोन अभिनेत्रींची चौकशी सुरू असताना आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चर्चेत आले आहे. पोलिसांच्या मते, या प्रकरणात आणखी ५ बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर येऊ शकतात. पण सध्या तरी बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या नावाने खळबळ माजली आहे.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नवीन चर्चेत आलेले नाव म्हणजे ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli). मिळालेल्या विविध बातम्यांच्या अनुसार, निक्की तांबोळीला सुकेशकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. त्यामुळे निक्कीचीदेखील चौकशी केली जाऊ शकते अशी चर्चा आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुकेश दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याची निक्कीसोबत भेट झाली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी इराणी ही सुकेशच्या अगदी जवळची व्यक्ती आहे. निक्की तांबोळी देखील याच पिंकी इराणीच्या माध्यमातून सुकेशला भेटली होती.

ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे की, एप्रिल २०१८ मध्ये सुकेशने पिंकीला १० लाख रुपये दिले होते. त्यापैकी दीड लाख रुपये निक्की तांबोळीला देण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यांनी निक्की एकटीच सुकेशला भेटली होती. त्यावेळीही देखील निक्कीला २ लाख रुपये आणि एक महागडी बॅग गिफ्ट देण्यात आल्याची माहिती आहे.

Team Beauty Of Maharashtra