ही बालकलाकार आता झालीये मोठी.. तुम्ही ओळखलंत का… कोई मिल गया मध्ये केलंय काम

अभिनेत्री हंसिका मोटवानी आठवतेय का? २००० साली तिने ‘शका लका बुम बुम’मधून टेलिव्हिजनच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली होती. ९० च्या दशकात जन्मलेल्या अनेक तरुण-तरुणींची ती एक आवडती बालकलाकार होती. हंसिका आज ०९ ऑगस्ट रोजी ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी आपण जाणून घेऊया. ‘शका लका बुम बुम’नंतर तिने ‘किसी देश में निकला होगा चांद’मध्ये आणि अभिनेता हृतिक रोशनच्या प्रसिद्ध ‘कोई मिल गया’ सिनेमात काम केले होते.
बालकलाकार म्हणून तिच्या या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. त्यानंतर ती २००७ साली आलेल्या हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’ सिनेमात दिसल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. काल-परवापर्यंत ज्या चिमुरडीकडे बालकलाकार म्हणून पाहिलं जात होतं ती अचानक मुख्य अभिनेत्रीच्या रुपात दिसल्याने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता.
अभिनेत्री हंसिका मोटवानीला ‘आप का सुरूर’मध्ये अचानक मोठी झाल्याचं पाहून चाहत्यांना सुखद धक्का तर बसलाच होता, पण त्यांना आश्चर्यही वाटलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार अशी माहिती समोर आली होती की तिने लवकर मोठं दिसण्यासाठी हॉर्मोनल इंजेक्शन घेतले होते. तिच्या आईनेच हे इंजेक्शन दिल्याचे बोलले जाते. पण याविषयी कोणती अधिकृत माहिती समोर आली नव्हती किंवा अभिनेत्रीने कधी याविषयी भाष्य केले नव्हते.
‘शका लका बुम बुम’ची ही चिमुरडी हंसिका आज ३२ वर्षांची झाली आहे. तिने वयाच्या १५ व्या वर्षी तेलुगू सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण केले होते. बॉलिवूडमध्ये तिने ‘आप का सुरूर’, ‘मनी है तो हनी है’ या सिनेमात काम केले. पण हे चित्रपट विशेष चालले नाहीत. तिने दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून हंसिंकाची ओळख आहे
२००४ साली तिने बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीसह ‘जागो’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते, तर तिने मनोज सोबतच मनी है तो हनी है या सिनेमात नायिका म्हणून काम केले आहे. हंसिकाची बालकलाकार म्हणून प्रेक्षकांमध्ये असलेली प्रतीमा तिच्या नायिका होण्याच्या मार्गात अडथळा ठरत होती. त्यामुळे तिला हिंदी सिनेमात विशेष यश न मिळाल्याचे बोलले जाते. दक्षिणेकडे मात्र तिचा चेहरा फ्रेश होता.
हंसिका मोटवानीने पुरी जगन्नाध यांचा तेलुगु चित्रपट ‘देसमुदुरु’ करण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार साधारण वर्षभर हा सिनेमा थिएटरमध्ये होता. ९ कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमाने २० कोटींची कमाई केली. हंसिका मोटवानीला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी साऊथ फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता. या सिनेमात तिने सुपरस्टार अल्लू अर्जुनसह स्क्रिन शेअर केली होती. आतापर्यंत हंसिकाने दक्षिणेतील जवळपास सर्व भाषांमध्ये जवळपास ५० चित्रपट केले आहेत.
पण तुम्हाला माहितेय का हंसिकाचे वडील प्रदीप मोटवानी तिने अभिनय क्षेत्र निवडण्याच्या विरोधात होते. तेव्हा तिच्या आईने त्यांना यासाठी तयार केले होते. तेव्हा हंसिकाच्या आईने असे सांगत तिच्या वडिलांना तयार केले होते की ती केवळ बालकलाकार म्हणून काम करतेय, कुठे तिला नायिका बनायचे आहे. आज अभिनेत्रीने बॉलिवूडसह दक्षिणेत काम करत स्वत:ला सिद्ध केले आहे. काही रिपोर्ट्सनुसार तिच्या आईची भेट जुही चावलाशी झाली होती, त्यावेळी जुहीने तिला अभिनय करण्याचा सल्ला दिला होता.