गणपतीची आराधना करताय? या गोष्टी लक्षात ठेवा, बाप्पा देईल चांगला आशीर्वाद

असे म्हटले जाते की, ज्याच्यावर श्री गणेशाची कृपा लाभते तो सुख, समृद्ध आणि आनंदी जीवन जगतो. अशा लोकांना दररोज शुभ लाभ मिळतात. तुम्हालाही गणपतीला प्रसन्न करायचे असेल तर हे उपाय करून पाहा आणि गणपतीची नित्य पूजा करताना या गोष्टींचे स्मरण ठेवा.
श्रीगणेशाच्या पूजेमध्ये रोज कुंकू अर्पण करावे. कुंकू हे सौभाग्य आणि मंगळाचे प्रतीक मानले जाते आणि ते गणेशाच्या कपाळावर लावल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. शिवाच्या तेजाने तयार होणाऱ्या पारापासून कुंकू तयार होते अशी मान्यता आहे. गणेशाला कुंकू अर्पण करताना या मंत्राचा जप करा.
“सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।
शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्।।”
गणेशाला प्रसन्न करण्यासाठी दररोज पूजेत दुर्वा अर्पण करावा. दुर्वाला दूब असेही म्हणतात आणि गणेशाला ती अतिशय प्रिय आहे. गणेशपूजेत दररोज २१ दुर्वा एकत्र करून एक गाठ बांधावी आणि त्यानंतर गणेशाच्या डोक्यावर २१ दूर्वा अर्पण कराव्यात. यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व अडथळे दूर होतात.
गणेशाच्या पूजेत शमीची पानेही अर्पण करू शकता. श्रीगणेशाला शमीची पाने अर्पण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि सर्व दुःखांचा नाश होतो. त्यामुळे मानसिक शांतीही मिळते. शनिदेवाला शमीची पाने अर्पण केल्याचे सामान्यतः पाहिले जाते, परंतु गणेशालाही शमीची पाने आवडतात. असे मानले जाते की, ज्या घरात शमीचे झाड असते त्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही.
लाडू किंवा मोदक गणेशाला खूप प्रिय आहेत आणि तुम्ही ते गणपतीला अर्पण करू शकता. शास्त्रात मोदकांचे वर्णन करताना आनंद असे लिहिले आहे. त्याचबरोबर गणपतीला सदैव प्रसन्न मानले जाते. म्हणून गणेशाला मोदक अर्पण केल्याने भगवान लवकर प्रसन्न होतात आणि मोदक किंवा लाडू अर्पण केल्याने ज्ञानही प्राप्त होते.
पूजेत या फुलांचा वापर करा- श्रीगणेशाच्या पूजेमध्ये लाल फुलांना खूप महत्त्व देण्यात आले असून हे फूल जास्वंदाचे असेल तर उत्तम. गणेशाच्या पूजेमध्ये जास्वंदाच्या फुलाचा समावेश केल्यास शुभ लाभ प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व संकटे बाप्पा दूर करतात.
असा तांदूळ गणपतीला अर्पण करा- गणपतीच्या पूजेमध्ये अक्षदा म्हणजेच पवित्र तांदूळ अर्पण करावा. तांदूळ तुटलेले आणि उकळलेले नाहीत याची काळजी घ्या. परशुरामाशी झालेल्या युद्धात गणेशाचा एक दात तुटल्यामुळे गणेशाला सुके तांदूळ अर्पण केले जात नाही. कारण गणेशजींना कोरडे तांदूळ खाणे कठीण जाते. म्हणून गणेशाला ओला तांदूळ अर्पण केला जातो.
असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही सुटका होते. ‘इदं अक्षताम ओम गणपतये नमः’ या मंत्राचा उच्चार करताना ओला करून गणेशाला तीनदा तांदूळ अर्पण करा.