तुम्हाला माहीत आहे का नवरात्र का साजरी करतात..? जाणून घ्या दुर्गा देवींचे नऊ रूपे आणि वैशिष्टये

नवरात्र हा एक महत्त्वाचा प्रमुख सण आहे जो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पौष, चैत्र, आषाढ आणि अश्विन महिन्यात प्रतिपदापासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ रात्री, महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि महाकाली या तीन देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, नवरात्रात विशेषकरून देवीची उपासना करायला पाहिजे. हे विशेषतः चैत्र आणि अश्विन या पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे. अश्विन मासातील शारदीय नवरात्रास ७ ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार असून, नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते. पाहूया नवरात्र उत्सव का साजरा करतात…
दुर्गा देवीचे ९ अवतार- नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते. प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादिक विधी आटोपून व सर्वप्रकारची मांगलिक तयारी करून ब्राह्मणाच्या हस्ते घटस्थापना केली जाते. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. तसेच नवरात्रोत्सवाच्या वेळी, दुर्गा देवीच्या ९ अवतारांची संपूर्ण पारंपारिक आणि परंपरागत विधींनी पूजा केली जाते.
कृषिविषयक लोकोत्सव- नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. ही प्रथा या सणाचे कृषिविषयक स्वरूप व्यक्त करते. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला.
श्रीरामांना लंका विजयाचा शुभाशिर्वाद- श्रीरामांनी नऊ दिवस केलेल्या पूजनाने भगवती देवी प्रसन्न झाली आणि श्रीरामांना लंका विजयाचा शुभाशिर्वाद दिला. यानंतर दहाव्या दिवशी रावणाचा युद्धात वध करून लंका विजय साध्य केला. या दिवसाला विजयादशमी म्हणून पुढे ओळखले गेले. अशी एक पुराण कथा असल्याचे सांगितले जाते.
महिषासुर दैत्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी दुर्गा देवीचे आवाहन केले. देवीच्या या शक्ती रुपाचे महिषासुरासोबत तब्बल नऊ दिवस युद्ध झाले. प्रचंड आणि भयंकर युद्धानंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला. यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरे करण्याची परंपरा सुरू झाली, अशी देखील पुराण कथा असल्याचे सांगितले जाते.