डिसेंबर महिन्यात ‘देवमाणूस २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

डिसेंबर महिन्यात ‘देवमाणूस २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस.’ या मालिकेने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मालिकेचा शेवट ज्या प्रकारे दाखवण्यात आला ते पाहून मालिकेचा दुसरा सिझन लवकरच येणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट देखील व्हायरल झाली आहे.

एका फॅन पेजने देवमाणूस मालिकेचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यावर ‘डिसेंबर महिन्यात देवमाणूस २ येणार? सध्या मालिकेच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरु आहे’ असे लिहिले आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे लवकरच ‘देवमाणूस २’ मालिका येणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आणखी वाचा : हृता दुर्गुळे ‘या’ दिग्दर्शकाला करतीये डेट, जाणून घ्या त्याच्या विषयी

काय होता मालिकेचा शेवट?- डिंपलच्या घरात सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली होती. या पुजेला बसण्यासाठी मंगल आणि बाबू यांनी डॉक्टरला विनंती केली. या विनंतीचा मान राखत देवीसिंग पूजेला बसतो. पूजेत चंदा दिसत नसल्याने देवीसिंग तिच्या शोधात बाहेर पडतो. त्याला डिंपल भेटते आणि पळून जाण्याविषयीचा नवीन प्लॅन त्याला सांगते. देवीसिंग तिचा प्लॅन ऐकून रात्री आठ वाजता भेट मग आपण पळून जाऊ असं सांगतो. त्यानंतर देवीसिंग रिंकी भाभीचा जीव घेतो. एवढंच नाही तर तिच्या कडे असलेला संपूर्ण पैसा आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा त्याचा प्लॅन असतो.

दुसरीकडे डिंपल देवीसिंगची वाट बघून थकते आणि चंदाकडे जाऊन हा सगळा प्लॅन सांगते. देवीसिंग पळण्याची तयारी करत असताना तिथे चंदा आणि डिंपल पोहोचतात आणि चंदा देवीसिंगकडून पैसा हिसकावून त्याच्या डोक्यात दगड घालते. देवीसिंग मेला अस समजून चंदा आणि डिंपल तिथून निघून जातात. मात्र, डिंपल चंदावर वार करत तिचा जीव घेते आणि पैशांची बॅग घेऊन निघून जाते.

डॉक्टर बराच वेळापासून परतला नाही म्हणून गावकर त्याच्या शोधात बाहेर पडतात. गावा बाहेर त्यांना आग लागलेली दिसते. त्यात चंदाचा मृतदेह त्यांना दिसतो, तर जवळच डॉक्टरचा चष्मा, घड्याळ आणि पेन दिसतो, हे पाहता तो ही मेला असेल असे गावकऱ्यांना वाटते. एका रात्री सगळे झोपले असताना डिंपल बॅग घेऊन बाहेर पडते आणि रुग्णालयात जाते.

तेथे एका माणसाला भेटते. तो माणूस मरोत आणि डॉक्टर त्या माणसाला मृत असल्याचे घोषित करतो. हा माणूस दुसरा कोणी नाही तर देवीसिंग असतो. डॉक्टर बाहेर जाताच तो जीवतं होतो आणि मालिका अशा प्रकारे प्रेक्षकांचा निरोप घेते. त्यामुळे आता मालिकेचा दुसरा सिझन भेटीला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Team Beauty Of Maharashtra