बुध ग्रह अवघ्या तासात मकर राशीत करणार प्रवेश, 22 फेब्रुवारीपर्यंत ‘या’ राशींनी जरा जपूनच

बुध ग्रह अवघ्या तासात मकर राशीत करणार प्रवेश, 22 फेब्रुवारीपर्यंत ‘या’ राशींनी जरा जपूनच

राशीचक्रात बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. चंद्रानंतर सर्वात गतीने परिवर्तन करणारा ग्रह आहे. त्यामुळे बुध ग्रहाचं राशीभ्रमण, अस्त आणि उदयाला जाणं, त्याचबरोबर वक्री भ्रमण करण्याची स्थिती वेगवान आहे. बुधाच्या परिवर्तनामुळे राशीचक्रावर वेगाने परिणाम दिसून येतो. राशीचक्रात बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. बुध हा ग्रह बुद्धि, संवाद, व्यवसायकारक ग्रह आहे. त्यामुळे बुधाच्या गोचराकडे ज्योतिष्याचं लक्ष लागून असतं.

बुध ग्रह कोणत्या ग्रहासोबत युती करतो, इथपासून ते अस्त किंवा उदीत स्थितीत आहे का? याकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून असते. गोचर कुंडली ही सर्वसमावेशक असते.त्यामुळे वैयक्तिक कुंडलीतील ग्रहांचं गणित पाहून काळ अनुकूल की प्रतिकूल याबाबत ठरवलं जातं.

बुध ग्रह 7 फेब्रुवारी 2023 रोजी गोचर करणार आहे. बुध ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सूर्यदेव आधीच ठाण मांडून बसल्याने बुधादित्य योग तयार होणार आहे. मात्र 13 फेब्रुवारीनंतर शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य योगाची स्थिती फक्त सात दिवस असणार आहे. त्यानंतर 13 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंतचा काळ काही राशींसाठी प्रतिकूल असणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना त्रास सहन करावा लागू शकतो.

वृषभ- या राशीच्या जातकांना बुधाची ही स्थिती थोडी त्रासदायक ठरणार आहे. कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच गुंतवणुकीच्या विचार करत असाल तर 22 फेब्रुवारीपर्यंत थांबा.तसेच वैयक्तिक कुंडलीतील स्थिती पाहून गुंतवणूक करा. या काळात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.

कर्क- गोचर कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहता या काळात पैसे देणं टाळा. तसेच आपली काही महत्त्वाची कामं कुणासोबतही शेअर करू नका. या काळात आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्या.

वृश्चिक- या राशीच्या जातकांना शनि अडीचकीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात बुधाची स्थिती त्रासदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक व्यवहार करताना जरा काळजी घ्या. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका.

धनु- या राशीच्या जातकांची नुकतीच साडेसातीतून सुटका झाली आहे. मात्र बुधाची स्थिती पाहता त्रास होऊ शकतो. भागीदारीच्या कामात अडचणींचा सामना करावा लागेल. बेरोजगार तरुणांसाठी हा काळ प्रतिकूल असून नोकरीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.

मकर- या राशीची लोकं शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा अनुभवत आहेत. त्यात बुधाची स्थिती प्रतिकूल असल्याने अडचणींचा सामना करावा लागेल. विनाकारण खर्च वाढू शकतो. त्यामुळे पैसे जपूनच वापराल. या काळात नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात.

Team BM