शिवलिंगावर बेलाची पाने का वाहतात माहित आहे का ही कारणे ?

शिवलिंगावर बेलाची पाने का वाहतात माहित आहे का ही कारणे ?

महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो. माघ कृष्ण पक्ष चतुर्दशीला शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे. मानले जाते की, या दिवशी उपवास केल्याने आणि आपल्या आवडत्या वस्तू भगवान शंकराला अर्पण केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात.

बेलपत्र हा महादेवाची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते. असे म्हणतात की, देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकराची बेलाच्या पानांनी पूजा केली होती, म्हणूनच बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत. आज आम्ही तुम्हाला शिवलिंगावर बेलपत्रे अर्पण करण्याची विविध कारणे आणि मान्यता सांगणार आहोत…

या पद्धतीने बेलपत्र अर्पण करा- यावेळी महाशिवरात्री मंगळवारी येत असल्याने बेलपत्र रविवारीच तोडणे योग्य राहील. शास्त्रात बेलाची पाने तोडण्याबाबत नियम सांगितला आहे की, सोमवारी आणि चतुर्दशीला बेलाची पाने तोडली जात नाहीत. महाशिवरात्री फक्त चतुर्दशीला साजरी केली जात असल्याने आणि यावेळी महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी सोमवार असल्याने बेलाची पाने रविवारीच तोडावीत.

११ किंवा २१ बेलाची पाने निवडतांना ते फाटलेले नसावे आणि स्वच्छ पाण्याने धुवावे. त्यानंतर एका भांड्यात गाईचे शुद्ध दूध घेऊन त्यात सर्व बेलाची पाने टाकावीत. त्यानंतर तुम्ही शिवलिंगाची पूजा करून भगवान शंकराला अभिषेक करा. त्यानंतर दुधाच्या भांड्यातून बेलाची सर्व पाने काढून स्वच्छ गंगेच्या पाण्याने धुवा. त्यानंतर प्रत्येक पानावर चंदनाने ‘ऊॅं’ लिहून त्यावर अत्तर शिंपडावे आणि ‘ऊॅं नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा आणि शिवलिंगावर गुळगुळीत पृष्ठभाग ठेवून सर्व बेलाची पाने अर्पण करावीत. प्रत्येक वेळी बेलाची पाने अर्पण करताना ऊॅं नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करावा.

पौराणिक कथांमध्ये बिल्वपत्राची कथा- पौराणिक कथांमध्ये बिल्वपत्राची कथा आढळून येते. यानुसार, समुद्र मंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले. या विषामुळे भूमीवरील जीव-जंतूंचा मृत्यू होऊ लागला. यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले विष शंकराने प्राशन केले. यामुळे त्यांचा कंठ नीळा पडला. यावरून शंकराला नीळकंठ नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र, विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके अत्यंत गरम झाले. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली.

शंकराची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले. त्यांच्या डोक्यावर बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवून, शंकरावर पाण्याचा अभिषेक केला. यामुळे शंकराचे डोके शांत झाले. बेलाची पाने थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच शिवपूजनावेळी बेलाच्या पानाचा सर्वाधिक वापर केला जातो.

म्हणूनच महादेवाला बेलपत्र सर्वात प्रिय आहे- पुराणात बेलपत्राविषयी एक कथा आहे की, माता पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, कठोर तपश्चर्या केली. त्यांनी अनेक प्रकारचे उपवास केले. एकदा महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी पूजेचे साहित्य आणायला विसरल्या. मग त्यांनी झाडाच्या गळून पडलेल्या पानांनीच शिवाची आराधना सुरू केली आणि देवाला पानांनी पूर्णपणे झाकून टाकले. यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासून त्यांना बेलाची पाने वाहिली जातात.

बेलची पाने अर्पण करण्याचे फायदे- मानले जाते की बेलाची पाने शिवाला अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळतो. निपुत्रिकांना मुलांचे सुख मिळते. शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत, त्या सर्वांचे मूळ बिल्व पत्रात असल्याची मान्यता आहे. शिवपूजनात बिल्व पत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.

Team Beauty Of Maharashtra