बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतर ‘Vishal Nikam’ची पहिली प्रतिक्रिया….

बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम ठरला आहे. शो जिंकल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड फिनाले उत्साहात पार पडला. या सीजनचा विजेता विशाल निकम ठरला आहे. जय दुधाणे आणि विशाल यांच्यात हा शेवटचा सामना रंगला. यामध्ये महाराष्ट्राचा रांगडा गडी विशाल निकम यांनी बाजी मारली. वीस लाख आणि ट्राफी त्याला देण्यात आली. यानंतर विशाल निकमची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
यावेळी विशाल निकम ट्रॉफी जिंकल्यानंतर म्हणाला की, तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद हे बघा काय झालंय..आज मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांचे, माझ्या रसिक मायबापांचे खरच मनापासून आभार ! मी नेहमीप्रमाणे सांगतो की, आईशप्पथ तुम्ही होता म्हणून मी इथपर्यंत आलो.
खूप खूप प्रेम…या गावतल्या पोराल तुमच्या प्रेमामुळे ही बिग बॉस मराठी सीजन तीन ट्रॉफी जगता आली.. आता ही सुरूवात झाली आहे शेवट पण लयभारी होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही बघाच मी किती फुल एनर्जीने काम करतो. असंच तुमचे प्रेम राहुदे..धन्यवाद आणि लय लव्ह यू….असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची त्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या तिसर्या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि आता तो या तिसर्या पर्वाचा विजेता ठरला.
विशाल निकमचा जन्म सांगलीतल्या खानापूर येथे एका शेतकरी कुटुंबात 10 फेब्रुवारी 1994 साली झाला. सांगलीतील विटा येथून त्याने भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर त्याने मिथुन चित्रपटातून 2018 मधे चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली. ही त्याची पहिली मालिका होती. धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे.
तसेच विशाल निकमने स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतीहासिक मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारली होती. यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा जोतिबा या पौराणिक मालिकेतील जोतिबाची भूमिका साकारली. यानंतर तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घरात पोहचला. या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली. या सगळ्या प्रवासात त्याला बिग बॉस मराठी तीसऱ्या पर्वात जाण्याची संधी मिळाली.