बिग बॉस’च्या घरातून सोनाली पाटीलची एक्झिट, टॉप ६ स्पर्धकांची नावे समोर

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या बिग बॉसमध्ये उरलेल्या ७ जणांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. बिग बॉसची चावडी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे यंदाच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? कोण सुरक्षित असणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
बिग बॉस मराठी ही स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यावर आली आहे. सध्या बिग बॉसमध्ये सात स्पर्धक पाहायला मिळत आहे. या सात स्पर्धकांपैकी एकाच्या एलिमिनेशननंतर सहा जणांमध्ये ग्रँड फिनाले रंगणार आहे. सध्या बिग बॉसमध्ये विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे आणि सोनाली पाटील हे सात स्पर्धक पाहायला मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतंच बिग बॉस मराठी ३ च्या घरातून टिक टॉक स्टार आणि अभिनेत्री सोनाली पाटील ही बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेण्याची शक्यता आहे. यामुळे आज सोनालीचा बिग बॉसच्या घरातील शेवटचा दिवस असल्याचे पाहायला मिळणार आहे.
सोनाली पाटील ही टिकटॉक स्टार म्हणून ओळखली जाते. वैजू नंबर वन या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर देवमाणूस मालिकेत तिने साकारलेली वकिलाची भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर ती थेट बिग बॉसच्या मंचावर दिसली.
सोनालीच्या एक्झिटनंतर विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे हे सहा स्पर्धक घरात उरले आहे. त्यामुळे आता या टॉप ६ स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनाले रंगणार आहे. दरम्यान या सहा जणांमध्ये विशाल, मीनल आणि जय हे तिघेही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे