Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकलेकडून आत्महत्येचा प्रयत्न? किसवरून झालेल्या वादानंतर नवा ड्रामा

बिग बॉस हिंदीच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंत, रश्मी देसाई, देवोलिना आणि अभिजित बिचुकले हे स्पर्धक आल्याने हा कार्यक्रम आधीपेक्षा अधिक मनोरंजक झाला आहे. या कार्यक्रमाला मनोरंजनाचा तडका देण्यासाठी या स्पर्धकांचा समावेश करण्यात आला होता. मात्र वाईल्ड कार्डच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरात आलेला अभिजित बिचुकले घरातील मंडळींना हैराण करून सोडेल असे कुणालाही वाटले नव्हते. अभिजित बिचुकले बिग बॉसच्या घरात रोज अशा काही उचापती करत असतो, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडते.
दरम्यान, काल तर अभिजित बिचुकलेने हद्दच केली. देवोलिनाकडे किस मागितल्यामुळे बिग बॉसच्या घरातील सर्व मंडळी अभिजित बिचुकलेच्या विरोधात एकवटली आहेत. घरातील सदस्यांनी अभिजित बिचुकलेचा एकप्रकारे बॉयकॉट सुरू केला आहे. दरम्यान, घरात एकटा पडत असल्याचे पाहून बिचुकलेने विषप्राषन करण्याची इच्छा व्यक्त केली.
अभिजित बिचुकलेने निशांत जवळ जाऊन सांगितले की, वॉशरूममध्ये कुठला कलर आहे का, मी तो खाऊ इच्छितो. कारण गेल्या दोन दिवसांपासून घरामध्ये जे काही होत आहे, त्यामुळे मी वैतागलो आहे. अभिजित बिचुकलेचे हे म्हणणे ऐकू निशांत भट्टला धक्का बसला. त्याने ही बाब शमिता आणि रश्मीला सांगितली. त्यानंतर बिचुकलेच्या मनातील विचार समजल्यावर प्रतीक त्याच्याजवळ गेला. तसेच त्याने अभिजित बिचुकलेला समजावण्याचा प्रयत्न केला.
तिकीट टू फिनाले टास्कदरम्यान, अभिजित बिचुकले याने देवोलिनाच्या मदतीच्या बदल्यात तिच्याकडे किसची मागणी केली होती. त्यानंतर देवोलिना हिने ही गोष्ट सर्वांसमोर सांगितली. त्यानंतर बिग बॉसच्या घरातील बहुतांश लोक बिचुकलेच्या विरोधात एकत्र झाले. अजब बाब म्हणजे बिचुकले आधी काहीतरी उचापत करतो. त्यानंतर आपली चूकही कबूल करत नाही. आता जर कुणी त्याला समजावू शकेल तर तो म्हणजे सा कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान हाच त्याला चार शब्द सुनावू शकतो. दरम्यान, वीकेंडचा प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये सलमान खान बिचुकलेची खरडपट्टी काढण्याची शक्यता आहे.