या मराठी अभिनेत्याला ओळखलंत का? ‘पांडू’ चित्रपटात साकारतोय महत्त्वाची भूमिका

वर्षाच्या सुरुवातीला ‘पांडू’ सिनेमाची घोषणा झाली आणि तेव्हापासून ‘पांडू’ नेमकं कोण साकारणार या चर्चेला उधाण आलं होतं. विनोदवीर भाऊ कदम ‘पांडू’च्या भूमिकेत तर कुशल बद्रिके ‘महादू’च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
आजवर विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रविण तरडेचा आगळा वेगळा करारी बाणा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आगामी ‘पांडू’ या सिनेमामधून तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. शिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र तो या सिनेमात साकारत आहे.
मराठी अभिनेता- या सिनेमातील ‘जाणता राजा’ हे छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. या गाण्यामधून त्याचा हा वेगळा लूक प्रेक्षकांना बघायला मिळतोय. विजू मानेचं दिग्दर्शन असलेल्या ‘पांडू’ सिनेमात भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्याबरोबर प्रविणचीही विशेष भूमिका आहे.
याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीही यात एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. ‘पांडू’ सिनेमातील या भूमिकेसाठी प्रविणचा एक खास लूक तयार करण्यात आलाय. याबद्दल तो म्हणाला की, ‘या भूमिकेबद्दल मी कमालीचा उत्सुक आहे. हा लूक प्रेक्षकांसमोर कधी येतो याची मी स्वतः गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होतो. माझ्या वाढदिवशी हे गाणं आणि माझा हा लूक प्रेक्षकांसमोर आलाय ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.’