३१ दिवसांनी शनी उदय: ‘या’ ५ राशींवर विशेष कृपा, समस्यांतून दिलासा; होळीपासून शुभ फलदायी काळ!

जानेवारी २०२३ मध्ये शनीने स्वराशीतून आपलेच स्वामित्व असलेल्या राशीत प्रवेश केला. मकर आणि कुंभ या दोन्ही शनीच्या राशी आहेत. १७ जानेवारी रोजी शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला. यानंतर अवघ्या १८ दिवसांनी शनी अस्तंगत झाला. आता ३१ दिवसांनंतर शनीचा उदय होत आहे.
०४ फेब्रुवारी २०२३ रोजी शनी कुंभ राशीत अस्तंगत झाला. शनी सुमारे महिनाभर अस्तंगत आहे. आता ०६ मार्च रोजी अस्त असलेल्या शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे. एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते.
तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते. यानुसार, आताच्या घडीला सूर्य आणि शनी दोन्ही ग्रह कुंभ राशीत आहेत. सूर्य आणि शनी एकमेकांपासून अगदी जवळच्या अंशांवर असतील.
सूर्याच्या प्रभावामुळे शनी पृथ्वीवरून दिसणार नाही. तसेच मार्च महिन्याच्या सुरुवातीला शनी सूर्यापासून लांबच्या अंशांवर जाईल. त्यामुळे ०६ मार्चपासून शनी पुन्हा दिसू लागेल. म्हणजेच शनीचा उदय होईल. याशिवाय, आताच्या घडीला बुध ग्रह कुंभ राशीत आहे. २८ फेब्रुवारीपासून बुध अस्तंगत होत आहे.
शनीचा उदय महत्त्वाचा मानला जात आहे. कुंभ राशीत शनी आता मजबूत स्थितीत येईल. यामुळे मेष, कर्क राशीसह अनेक राशींना शुभ फळे मिळू शकतील. होळीपासून ५ राशींवर शनिदेवाची विशेष कृपा असेल. शनीच्या उदयाचा कोणत्या राशींना फायदा होऊ शकेल? ते जाणून घेऊया…
मेष- मेष राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय इच्छापूर्तीचा ठरू शकेल. छुपे शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांकडून सुरू असलेल्या अडचणी संपतील. आर्थिक सुधारणांसाठी केलेल्या योजनाही यशस्वी होतील. कार्यालयात पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. रोजंदारीच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. होळीपासून धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफाही मिळू शकेल. जीवनसाथीसोबत चांगले संबंध राहतील. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
कर्क- कर्क राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय अनुकूल परिणाम देऊ शकेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अडचणी नशिबाच्या पाठिंब्यामुळे दूर होऊ शकतील. होळीनंतर धन-समृद्धी शुभ होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. अडकलेल्या कामात एखाद्या व्यक्तीची मदत मोलाची ठरू शकेल.
सिंह- सिंह राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय शुभ परिणाम देऊ शकेल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. शनिदेव आणि सूर्यदेवाच्या आशीर्वादाने संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. अडचणी संपुष्टात येऊ शकतील. रखडलेल्या कामांनाही गती मिळू शकेल. वडिलांसोबतचे मतभेद मिटू शकतील. अनेक कामे पूर्ण होतील. होळीपासून काळ अनुकूल राहील. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील.
धनु- धनु राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय दिलासादायक ठरू शकेल. अनेक समस्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत किंवा परदेशात जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. होळीपासून आर्थिक समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. परंतु त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.
कुंभ राशीतच शनी अस्त झाला होता. याच राशीत आता शनीचा उदय होत आहे. या राशीच्या व्यक्तींना आगामी काळात नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम संधी मिळू शकतील. मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी वेळ अनुकूल आहे. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तब्येतीत चांगली सुधारणा होऊ शकेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल.